| धुळे | प्रतिनिधी |
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळनेर येथे गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर बघता-बघता हिंसक हाणामारीत झाले. नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात एकूण आठ जण जखमी झाले. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश सुपडुगिर गोसावी (रा. साक्री), साहील सुरेशगिर गोसावी (रा. साक्री), देवा रवींद्र पवार (रा. साक्री) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लग्नासारख्या पवित्र कार्यात ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.







