| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील मंदिरफोडी प्रकरणातील आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा (38) याला सोमवारी (दि.23) अलिबाग न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. त्याला प्रत्येकी 1 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महेश चायनाचखवा याने थेरोंडा गावातील पाच पाढे कोळी समाजाच्या खंडोबा मंदिरातील लाकडी देव्हाऱ्यातील 3 मोठ्या चांदीच्या मूर्तींचे टाक, 6 लहान चांदीच्या मूर्तींचे टाक व 1 चांदीचा लोलक असा 94 हजार 800 किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. तसेच, आगल्याची वाडी येथील मुंबईकर कुटुंब व ढोलके कुटुंबीयांच्या कुलदैवतांच्या रूमची कडी तोडून 4 चांदीच्या मूर्तींचे टाक, एकवीरा देवीचा चांदीचा मुखवटा व चांदीचा लोलक असा एकूण 1 लाख 60 हजार 800 किमतीचा मुद्देमाल चोरला होता. रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि बी.के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोसई डी.जे. म्हशिलकर व पोनि देविदास मुपडे यांनी कौशल्यपूर्ण तपास करत सर्व मुद्देमाल जप्त करून तो संबंधितांना परत करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.







