जड-अवजड वाहनांना अटी शर्तीवर मे पर्यंत बंदी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-सहाणबायपास या मार्गासह अलिबाग-रेवदंडा मार्गावर रस्ता, मोरी, पुलांची कामे सुरु आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते सात यावेळेत 31 मेपर्यंत बंदीचे आदेश असणार आहेत.
अलिबाग-रोहा मार्गावरील अलिबाग सुडकोली तसेच अलिबाग मुरूड मार्गावरील अलिबाग-रेवदंडा रस्ता कायमच वर्दळीचा आहे. हजारो वाहनांची ये-जा या रस्त्यांवरून होते. नोकरी व्यवसायानिमित्त तसेच शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी अलिबाग-मुरूड रेवदंडा, सुडकोली व रेवदंडा येथे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे मार्ग कायमच वाहनाने गजबजलेले असतात.
अलिबाग-कुरुळ-बेलकडे-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अलिबाग -कुरुळ-नवेदर बेली-आक्षी-नागाव-रेवदंडा या मार्गावर रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, मोरी, पुल दुरुस्ती करण्यासह नव्याने बांधकाम करण्याची कामे जोरदार सुरु आहेत. रस्त्यासह मोरी, पुलांच्या कामांसाठी खोदकाम ठिकठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. काही वाहनांची अपघातही झाले आहेत. वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांसह पर्यटकांनादेखील या वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे.
स्थानिक नागरिक, रुग्णवाहिका, विद्यार्थी, पर्यटक व दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. अखेर प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून जड व अवजड वाहनांना अटी शर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. अलिबाग-कुरुळ-बेलकडे-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अलिबाग -कुरुळ-नवेदर बेली-आक्षी-नागाव-रेवदंडा या दोन्ही मार्गावर सकाळी नऊ ते दुपारी 12 तसेच सायंकाळी पाच ते सात यावेळेत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जावळे यांनी काढले आहे. ही अधिसुचना दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला पाणी आदी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने यांना लागू राहणार नाही, असे लेखी सांगण्यात आले आहे.







