जिल्ह्यात पाच हजार होळ्या उभारणार; 120 ठिकाणी मिरवणुका
| रायगड | प्रमोद जाधव |
होळी व धुळीवंदन सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, जिल्हाभर तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा 2 मार्च रोजी होळी, तर 3 मार्चला धुळीवंदन साजरे होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात एकूण 5,060 ठिकाणी होळ्या उभारल्या जाणार असून, विधीवत पूजनानंतर त्यांचे दहन केले जाईल. होलिकोत्सवानिमित्त 120 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाभर उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
कोकणात होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. होळी उभारण्यासाठी केळी, सावरी, पोफळी तसेच काही ठिकाणी सुपारी, आंबा आदी झाडांचा वापर केला जातो. दक्षिण रायगडात काही भागांत होळीचा सण तब्बल 15 दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. समुद्रालगतच्या गावांमध्ये व कोळीवाड्यांमध्येही होळी उत्साहात साजरी होते.
पारंपरिक पेहरावात होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि रात्री होळीचे दहन केले जाते. जिल्ह्यातील 3,940 सार्वजनिक, तर 1,120 खासगी होळ्या उभारल्या जाणार आहेत. धुळीवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करत मिरवणुका काढल्या जातील. अलिबाग समुद्रकिनारी धुळीवंदनानिमित्त पारंपरिक बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येणार आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताची आखणी केली आहे. होळी व धुळीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रमांच्या ठिकाणी पोलीस तैनात राहणार आहेत.
जिल्ह्यात एकूण 743 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये 89 अधिकारी, 614 अंमलदार आणि 40 वाहतूक पोलीस यांचा समावेश आहे. याशिवाय 8 स्ट्रायकिंग फोर्स, 3 आरसीपी पथके आणि 1 अतिशीघ्र दल सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
पर्यावरणपूरक होळीचे आवाहन
होळीच्या निमित्ताने लाकूड मिळवण्यासाठी अवैध वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. अनधिकृत वृक्षतोड व वन्यप्राण्यांची शिकार यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. अनेक ठिकाणी गोवऱ्या व लाकूड जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. म्हणूनच सार्वजनिकरित्या एकत्रित होळी साजरी करून वृक्षतोड टाळावी, पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.
अवैध वृक्षतोडीवर कारवाईचा इशारा
शहरी विस्तारामुळे वाढती वृक्षतोड पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अनधिकृत वृक्षतोड महागात पडू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
चाकरमान्यांसाठी एसटीची विशेष व्यवस्था
गावाकडे होळी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांतून चाकरमानी मोठ्या संख्येने रवाना होत आहेत. काहीजण खासगी वाहनांनी, तर काहीजण एसटी बसने प्रवास करणार आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली आहे. विनाथांबा फेऱ्याही गरजेनुसार वाढवण्यात येणार असून, प्रवास सुरक्षित व आरामदायी व्हावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.






