| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवारी (दि.27) ‘मला आवडलेली गोष्ट/मला आवडलेले पुस्तक’ या वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवपर वातावरणात झाली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने व ओघवत्या मराठीत आपली मते मांडली. सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांनी ‘मला आवडलेली गोष्ट/मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर निरागस शैलीत गोष्टी सांगत व भाषणे करत उपस्थितांची मने जिंकली. मराठी भाषेचे संवर्धन आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन केल्याबद्दल कार्यकारी मंडळाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.







