सुदैवाने जिवीतहानी टळली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग- पेण मार्गावरील वडखळ नाका येथील धरमतर पेट्रोल पंपाजवळ दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. अखेर पाण्याचा मारा देऊन आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, दुचाकी पुर्णतः जळून गेली. सुदैवाने जिवीतहानी आणि मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अकस्मात अग्नीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपली दुचाकी घेऊन चालक वडखळ नाका येथील धरमतर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि.6) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल भरून झाल्यावर तो गाडी चालू करत असताना अचानक गाडीने पेट घेतला. बघता बघता आगीचा भडका वाढला. त्याठिकाणी असलेल्या अनेकांची धावाधाव सुरु झाली. भितीचे वातावरण निर्माण झाली. आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तरी देखील आगीचा भडका वाढत गेला. अखेर पाण्याने भरलेल्या टँकरला पाचारण करण्यात आले. पाण्याच्या माऱ्याने आग आटोक्यात आली. परंतुए दुचाकी पूर्णतः जळून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. यापुर्वीदेखील अलिबागजवळील चेंढरे बायपास रस्त्यावर चारचाकी गाडीने भर रस्त्यात पेट घेतला होता. त्यामुळे वाहने पेटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानाचा अथवा इंजिनमधील बिघाडामुळे ही आग लागत असल्याचे काही मंडळींकडून बोलले जात आहे.







