| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान चार उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चारही उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, कळंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात उघडकीस आली.
पोलीस बनण्याचे स्वप्न घेऊन भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनीच कायद्याचा भंग केल्याने अखेर त्यांनाच पोलीस ठाण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मुंबईसह राज्यभरात पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पहाटेपासूनच भरती प्रक्रियेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारांना उन्हाच्या झळा कमी सहन कराव्या लागल्या. तसेच नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे उमेदवारांना शारीरिक चाचणीदरम्यान चांगले मैदान आणि इतर आवश्यक सुविधा कळंबोली (रोडपाली) येथील पोलीस मुख्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.2024-2025 या वर्षासाठी पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि बँड्समन अशा एकूण 527 विविध पदांचा समावेश या भरती प्रक्रियेत आहे. या भरतीसाठी सुमारे 54 हजार उमेदवारांनी अर्ज नोंदवले आहेत.
दररोज सुमारे दीड ते दोन हजार उमेदवार शारीरिक चाचणी देणार असल्याचे नियोजन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. 17 मार्चपर्यंत शारीरिक चाचणी पूर्ण करण्याची आखणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस शिपायांच्या सतर्कतेमुळे चार संशयित उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारची घटना प्रथमच उघडकीस आली आहे. या घटनेनंतर इतर उमेदवारांचीही तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात आली.
इंजेक्शन जप्त केलेल्या उमेदवारांचे वय अनुक्रमे 21, 26, 29 आणि 30 वर्षे असे आहे. त्यापैकी तीन उमेदवार आहिल्यानगर जिल्ह्यातील तर एक उमेदवार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या उमेदवारांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आणि इंजेक्शन देण्यासाठी वापरली जाणारी सुई आढळून आली. पोलीस मुख्यालयातच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांना तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी या चारही उमेदवारांवर गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या.
संजय ऐनपुरे, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई
शारीरिक चाचणीदरम्यान शरीरावर परिणाम करणारे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन उमेदवारांनी घेऊ नये. कारण अशा इंजेक्शनचा दूरगामी परिणाम संबंधित उमेदवाराच्या मनावर आणि शरीरावर होऊ शकतो. जे उमेदवार करिअरच्या सुरुवातीलाच शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करतील, ते पोलीस खात्यात दाखल झाले तरी टिकणार नाहीत. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी असे शॉर्टकट कोणीही वापरू नयेत. असे यश कायम टिकत नाही.





