यंत्रणांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत
| खोपोली | प्रतिनिधी( संतोषी म्हात्रे ) |
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन ब्रिज परिसरात मासे वाहतूक करणारा AP 16 TF 3379 क्रमांकाचा ट्रक आज (दि. 13) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट), डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, ट्रक हटविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे मोठी कोंडी होण्यापासून दिलासा मिळाला. या अपघातात ट्रकमधील दोन जणांना किरकोळ स्वरूपाचा मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते.
क्रेनच्या मदतीने ट्रक सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद खोपोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.







