| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाहीत. त्यातच रांगाच्या रांगा या सिलेंडर घेण्यासाठी लागलेल्या दिसून येत आहेत. पनवेल परिसरात गॅस सिलेंडरच्या घरपोच सेवा देणाऱ्या गाड्या देखील बंद झालेल्या आहेत. गावात घरपोच गॅस सिलेंडर देण्यासाठी गाड्या जात नसल्याने नागरिकांना गॅस पुरवठा करणाऱ्या वितरकाकडे जाऊन रिक्षा भाड्याचे पैसे खर्च करून गॅस घ्यावा लागत आहे. गॅसची टंचाई नसल्याचे शासन आणि तालुका स्तरावरील अधिकारी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे दिसत आहे. गॅस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. त्यातच पनवेल परिसरातील घरपोच सेवा देणाऱ्या गॅस सिलेंडरच्या गाड्या कित्येक दिवसांपासून गावात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना वितरकाकडे त्यांच्या कार्यालयात जाऊन गॅस सिलेंडर घ्यावा लागतो. नितळस येथील नागरिकांनी पुरवठा विभाग पनवेल यांच्याकडे याबाबत तक्रार केली. याबाबत पुरवठा विभागाला कसल्याही प्रकारची माहिती नाही. पुरवठा विभाग या गाड्या बाबत अनभिज्ञ आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही समस्या उद्भवत असली तरी देखील पनवेल पुरवठा विभागाने अद्यापही कोणतीही चौकशी केलेली दिसत नाही. याबाबत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता गाड्या गावात येत नसतील तर त्यांना नोटीस दिली जाईल असे सांगितले. मात्र कारवाई कोणती होणार याबाबत बोलणे टाळले.







