| ठाणे | प्रतिनिधी |
वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरता आकडे टाकून वीज वापरणाऱ्या डोंबिवलीतील एका ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील तानाजी काळूराम काठे या वीज ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आले. फेब्रुवारी-2026 अखेरीसची 56 हजार 460 रूपयांची थकबाकी न भरल्याने मुख्य कार्यालयाकडून सदर ग्राहकाचा वीज पुरवठा स्वयंचलित पद्धतीने बंद करण्यात आला. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर या ग्राहकाने देयकाचे पैसे न भरता मीटर बायपास करून चोरीची वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब महावितरणच्या तपासणी पथकाला आढळून आली. यानंतर या ग्राहकाचा वीज पुरवठा थेट वीज खांबावरून बंद करण्यात आला. या प्रकरणी महावितरणकडून वीज ग्राहक तानाजी काठे याच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.






