| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अनधिकृत शाळा सुरू ठेवल्याप्रकरणी सनराइज (सनशाईन) इंग्लिश स्कूल वावंजे येथील संस्थाचालक इरफान शेख आणि मुख्याध्यापक मारिया दारूवाले यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 17 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
अनधिकृत शैक्षणिक संस्था बंद करून त्या विद्यार्थ्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत दाखल करावे, तसेच शासन नियमानुसार असलेला दंड भरून शाळा बंद करावी आणि संस्था बंद केल्याबाबत हमीपत्र सादर करावे, अशा संदर्भात अनधिकृत शाळांना पनवेल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ही सनराईज (सनशाईन) इंग्लिश स्कूल वावंजे ही मान्यता प्रमाणपत्र शिवाय अनधिकृतरित्या सुरू असल्याने त्या शाळेला गटशिक्षणाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी शाळा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे इरफान शेख आणि मारिया दारूवाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.






