131 पैकी केवळ 37 कामे पूर्ण; शंभरहून अधिक प्रकल्प रखडले
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पांची कामे अद्याप संथ गतीने सुरू असून, बहुतांश ठिकाणी ही कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण 131 ठिकाणी या योजनेची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी केवळ 37 कामेच पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समिती पनवेलच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शंभरहून अधिक कामे नेमकी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेची सुरुवातच अपेक्षेप्रमाणे वेगाने झाली नाही. सुरुवातीपासूनच निधीची कमतरता, आवश्यक जागा उपलब्ध न होणे, प्रशासकीय अडचणी आणि नियोजनातील त्रुटी यामुळे अनेक प्रकल्प अडचणीत सापडले. काही ठिकाणी कंत्राटदारांनी एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने कोणतेही काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी, अनेक गावे आजही अपूर्ण योजनांच्या प्रतीक्षेत आहेत.
याशिवाय, निधीअभावी कंत्राटदारांना देयके वेळेवर न मिळाल्याने कामांचा वेग आणखी मंदावला आहे. सध्या तालुक्यातील सुमारे 30 पेक्षा अधिक कामे पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत असून, उर्वरित कामेही अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी केवळ पाईपलाईन टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे, तर काही ठिकाणी जलसाठा टाक्या आणि इतर मूलभूत सुविधा अपूर्ण अवस्थेत आहेत.
दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. जर ही जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण झाली असती, तर या परिस्थितीत मोठा दिलासा मिळाला असता. मात्र, कामांच्या विलंबामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.







