| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, एप्रिल महिन्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुरुड तालुक्यातील एकदरा, राजपुरी, चोरध्ये, वेळस्ते, काशीद आणि मांडला या सहा ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर मे महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल ते 13 एप्रिलदरम्यान पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. काही सदस्यांची पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली असून विशेषतः अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे काही जागा रिक्त झाल्या आहेत. एकदरा ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राजपुरी येथे अनुसूचित जमातीच्या तीन जागांसाठी मतदान होईल, तर चोरध्ये येथे अशाच दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. वेळस्ते येथे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे.
काशीद ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एक अशा दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. मांडला ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच रंगणार आहे.







