कळंबोलीतील झुडिओ मॉलजवळ बांधकाम व्यावसायिकाची अरेरावी, पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध
| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली परिसरातील जुन्या झुडिओ मॉलजवळ स्थानिक पत्रकार शैलेश श्यामसुंदर चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
शैलेश चव्हाण हे लक्ष्मी ग्रुप अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर मित्रांसोबत गाडीत बसले होते. यावेळी बांधकाम व्यावसायिक वाजिद शेख हा बाहेर येऊन चव्हाण यांच्या गाडीचे फोटो काढू लागला. फोटो का काढला? असा जाब विचारण्यासाठी चव्हाण खाली उतरले असता वाजिद शेख याने संतापून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चव्हाण यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपीने जास्त बोललास तर गाडीखाली चिरडून टाकेन अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आई-बहिणींवरून अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आरोपीचा वडील घटनास्थळी येऊन चव्हाण यांची कॉलर पकडत तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देत तेथून निघून गेले. दरम्यान, चव्हाण यांनी आपण स्थानिक पत्रकार असल्याचे सांगत शांततेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर वाजिद शेख हा आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात राजकीय पदाधिकारी जमा झाले. कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन तास उलटूनही आरोपी हजर न झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असला तरी घटनेची गंभीरता लक्षात घेता तातडीने दखलपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.






