| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील खुटील हनुमान वाडी (होडबेकोंड) येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जय हनुमान प्रतिष्ठान क्रिकेट संघ यांच्या पुढाकाराने तसेच जय हनुमान मित्र मंडळ मुंबई पुणे ठाणे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ खुटील हनुमानवाडी यांच्या सहकार्याने गेली चार वर्ष सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष असून 5 एप्रिल 2026 रोजी खुटील हनुमानवाडी धरणाजवळ ही स्पर्धा पार पडणार आहे. क्रिकेट रसिकांना ही स्पर्धा थेट यूट्यूब लाईव्ह स्वरूपात पाहता येणार असल्याचे जय हनुमान प्रतिष्ठानचे कर्णधार समीर गायकवाड यांनी सांगितले. एक गाव एक संघ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ही स्पर्धा तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असोसिएशनच्या नोंदनीकृत 24 संघांदरम्यान खेळवली जाणार आहे. परिसरातील क्रिडाप्रेमींसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणी ठरणार असून दिवसभर क्रिकेटप्रेमींची उस्फुर्त उपस्थिती अपेक्षित आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघाना आकर्षक चषक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच मालिकावीर, उकृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही विशेष चषक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.







