| मुंबई | प्रतिनिधी |
भायखळ्यातील मुंबई अग्निशमन मुख्यालयात रंगलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मालेगाव शूटिंगबॉल शो रंगला. इस्तियाक मालेगाव संघाने अचूक खेळाचा नमुना सादर करत विजेतेपदावर झेंडा रोवला. किशोर घाडीगावकर स्मृतिचषकासाठी मुंबईच्या अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच आणि मुंबई शूटिंगबॉल संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत मालेगावच्या इस्तियाक संघ आणि आयएससी संघात अंतिम सामना रंगला आणि संघर्षपूर्ण लढतीत इस्तियाक मालेगावने आयएससी मालेगावचा 15-07, 16-14 असा पराभव केला. इस्तियाक, यासीन व मुबासिर यांच्या दमदार खेळाला वकारने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार आव्हान दिले, मात्र विजय इस्तियाकच्या बाजूने झुकला.







