| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर गाडीच्या टेलिफोन आणि सिग्नल यंत्रणेसाठी केबल टाकण्यात आली आहे. दरम्यान, मिनीट्रेन माथेरानकडे जात असताना या मार्गावरील सिग्नल यंत्रणेची केबल जळत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी मिनीट्रेनमधून प्रवास करणारे तिकीट तपासनीस विजय लांडगे यांच्या हि बाब लक्षात येताच मिनिट्रेन थांबवली आणि ती आग विझविण्याचे प्रयत्न केले.
ब्रिटिश काळात सुरू झालेल्या 21 किलोमीटर लांबीच्या मिनीट्रेन मार्गावर असलेल्या स्थानकांना जोडण्यासाठी सिग्नल तसेच टेलिफोन यंत्रणेची केबल या टाकण्यात आली आहे. दरम्यान, दि.27 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास मिनीट्रेन माथेरानकडे प्रवाशांना घेऊन जात असताना कड्यावरचा गणपतीच्या पुढे पोहचली असता, टीसी विजय लांडगे यांना नॅरोगेज ट्रॅकच्या बाजूला दगडामध्ये असलेली केबल जळताना दिसली. त्यांनी त्वरीत मिनीट्रेन चालकाला गाडी थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर विजय लांडगे यांनी क्षणाचीही विलंब न लावता ही बाब रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आणून दिली आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळात ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुर्ण डोंगर जळून बेचिराख होऊन निसर्गाची मोठी हानी झाली असती.






