| महाड | प्रतिनिधी |
सेंचुरी कंपनीच्या कोकण सिंथेटिक फायबर या महाड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कामगारांचे अनोखे मिलन शुक्रवारी महाड येथे पहावयास मिळाले. महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून कोकण सिंथेटिक फायबर या कंपनीचा आज सुद्धा उल्लेख केला जातो. 1990च्या दशकात या कंपनीने सुरू केलेले उत्पादन 2014 पर्यंत सुरू होते. त्या पश्चात आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर ही कंपनी बंद करण्यात आली. मात्र, 1990 वर्षात उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असताना या कंपनीमध्ये असलेले विविध विभागातील मॅनेजर स्तरावरील अनेक अधिकारी आजही महाडमधील कामगार वर्गाच्या सातत्याने संपर्कात असतात. सुमारे 35 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर शुक्रवारी यापैकी 12 उच्चपदस्थ अधिकारी आपल्या कुटुंबीयांसमवेत दापोली मुक्कामी जाण्यासाठी काही काळासाठी महाड येथे थांबले होते. यावेळी महाडमधील सुमारे 25 ते 30 कामगार व 12 अधिकारी यांचे अनौपचारिक तातडीचे मिलन झाले. सुमारे एक ते दोन तासांमध्ये उपस्थित सर्वांनीच प्रत्येकाच्या कुटुंबीयांची तसेच व्यवसायाची आपुलकीने केलेली चौकशी ही केवळ औपचारिकतेचा भाग नव्हता हे प्रत्येकालाच जाणवले होते. या भेटीनंतर कामगार वर्गामध्ये देखील आपल्यावर झालेल्या केएसएफ कंपनीतील संस्काराचे धागे आजही तेवढ्याच ताकतीने मजबूत असल्याचे जाणून आले.







