| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ढाक आणि पोटल भागात उभारण्यात येणाऱ्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून आता राजकीय पक्ष देखील या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने शासनाच्या विविध खात्यांना आपल्या विरोधाचे निवेदने देण्यात आली.
कर्जतमध्ये टोरंट जलविद्युत प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प पाली तर्फे कोतल खलाटी, साई डोंगर, भालिवडी, ढाक बहीरी परिसरात होणार आहे.प्रकल्पासाठी वनविभागाच्या सुमारे 600 एकर जमिनीचा वापर होणार असून काही लाख झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात विरोधाची तीव्रता वाढत असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देत प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने निवेदन प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत, युवासेनेचे संपत हडप, तसेच टोरंट प्रकल्प परिसरातील शेतकरी उपस्थित होते.







