| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत अंत्यविधी शुल्काच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी अंत्यविधी खर्च सुमारे 2 हजार 500 रुपये, तर बाहेरील नागरिकांसाठी तब्बल 4 हजार 100 रुपये आकारले जात असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. अंत्यविधी करता पालिका आणि मंडळ हे बघत असतात. त्यांनी अंत्यविधी कर्मचारी ठेवले आहेत. असे असतानाही या दरातील तफावत म्हणजेच भेदभाव असल्याचा आरोप नगरसेवक लतीफ शेख यांनी केला आहे. पालिका सेवा देत आहे की व्यवसाय करत आहे? असा थेट सवाल देखील त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
दरम्यान, अंत्यविधीसारख्या संवेदनशील सेवेतही आर्थिक फरक का केला जातो, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. मृत्यूनंतरही नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. जीवनभर उपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही शेवटच्या विधीसाठी पैसे मोजावे लागणे ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेत अंत्यविधी मोफत केला जात असल्याचे एकण्यात आले आहे, पनवेलमध्येही अशीच योजना लागू करण्याची मागणी झाली. पालिका स्तरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना नागरिकांना दिलासा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला.







