। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीत एका गजबजणाऱ्या परिसरात गोळीबार झाला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली परिसरात सोमवारी (दि.6) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऐरोली सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ येथे अमित मौर्य आणि संदीप गवस हे उभे होते. यावेळी संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून येऊन गोळीबार केला. यामध्ये अमित मौर्य गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी व्यक्ती अमित मौर्य यांना तातडीने ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असून गोळी मानेत घुसली असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच तातडीने रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्यामध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून येऊन गोळीबार करताना दिसत आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नसून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







