| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोलीतील स्टील मार्केट परिसरात भरदिवसा थरारक प्रकार घडला असून, दुचाकीवरून जाणार्या व्यापार्याचा पाठलाग करत चोरट्यांनी तीन लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळंबोलीतील 55 वर्षीय व्यापारी हे त्यांच्या स्टील मार्केटमधील गोदामावरून दुचाकीने तळोजा येथे गेले होते. तळोजातून परत येत असताना दोन युवक त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत असल्याची त्यांना जाणीव झाली. स्टील मार्केटमधील गोदाम क्रमांक 1640 समोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच, पाठलाग करणार्या चोरट्यांपैकी मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावली. या झटापटीत व्यापार्याच्या मानेस दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सतीश नवले यांनी घटनेची नोंद करून जखमी व्यापार्याला उपचारासाठी पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यासाठी पथक नेमले आहे. यापूर्वी सोनसाखळी चोरीच्या घटना प्रामुख्याने महिलांना लक्ष्य करून घडत होत्या. मात्र, आता दागिने घालणार्या पुरुषांनाही लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. नवी मुंबई परिसरात वाढत्या रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






