| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
पाली-खोपोली रस्त्यावर खुरावले फाटा येथे वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर बहुजन विद्यार्थी संघटनेतर्फे गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मा. कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, रायगड विभाग तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एमएसआरडीसीमार्फत शेकडो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः खुरावले फाटा हा अपघातप्रवण ठिकाण बनला असून, येथे वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविणे अत्यंत आवश्यक असून, त्यातून अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल, असे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अमित बाळू गायकवाड यांच्यासह रमेश जाधव, राहुल कांबळे, नितीन यादव, किसन धायगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







