सोलापूरचा विजय लामकाने राज्यात पहिला, आरती जाधव महिलांमध्ये पहिली
| नागपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी) 27 ते 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2024 चा अंतिम निकाल 8 एप्रिल, 2026 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध 20 संवर्गातील एकूण 461 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम तर सोलापूर जिल्हातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. अंतिम निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या.
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुदयांसंदर्भात विविध मन्यायालयात न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.







