पोलिसांच्या समन्वयाने व्यापाऱ्यांची बैठक; दिलेल्या वेळेतच वाहनांना प्रवेश
| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर गेली अनेक दिवस वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आता दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या समन्वयाने ही कोंडी फुटणार आहे.
विकेंडच्या दिवसात वाहतूक कोंडीबाबत प्रभारी अधिकारी आवटी यांनी बोर्ली शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मालवाहतुकीचे ट्रक कोणत्याही वेळेत पार्किंग करण्यावरून वाहतूक कोंडी होण्याचा मुद्दा समोर ठेवण्यात आला.
दिवेआगर तसेच दिघी व श्रीवर्धनकडे जाण्यासाठी बोर्लीपंचतन हाच मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. याशिवाय स्थानिकांना देखील या गाड्यांचा त्रास होतो. सद्या पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी बोर्लीलाच येतात. शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी याच मार्गाने जातात. यामुळे वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांब असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटत नाही.
राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरची ओळख आता वाढू लागली आहे. परिणामी बोर्लीपंचतन शहरातील बाजार पेठेतील बेकायदा पार्किंगमुळे एसटी महामंडळाच्या लांब पल्याच्या गाड्या, पर्यटकांची ये-जा, सोबत दळणवळणासाठी परिसरातील गावांचा सबंध असल्याने वाहतूक नियंत्रण न होण्यास कारण बनले आहे. यावेळी पोलिसांकडून कोंडीवर कायमस्वरूपी नियोजन होत असल्याने लवकरच प्रवासी, पादचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
पोलिसांनी सुचवले हे उपाय -
व्यापाऱ्यांनी दुपारी यावेळेत माल उतरावा, एकाच वेळेला किराणा मालाचे ट्रक रस्त्यात पार्किंग करू नये, दिवेआगर पर्यटनसाठी वीकेंडला होणारी गर्दी पाहता, या दिवसात माल ट्रक बोलावू नये. आता पोलिसांच्या या नियोजनामुळे लवकरच चालकांना दिलासा मिळणार आहे.




