| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातून जाणाऱ्या नेरळ- माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील नेरळ पाडा येथील फाटक गेली चार दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना वाहनचालक यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची भावना असून, मध्य रेल्वे विभागाच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
नेरळ -माथेरान -नेरळ मिनी ट्रेन नेरळ गावातून जाते आणि या 21 किलोमीटर लांबीचे मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता आणि रेल्वे मार्गिका यांच्यात फाटक आहेत. मात्र, त्यातील दोन रेल्वे फाटके ही महत्वाची असून एक फाटक हे कर्जत- कल्याण राज्यमार्ग तर दुसरे फाटक हे माथेरान- नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्यावर आहे. मिनी ट्रेन ये-जा करीत असताना या दोन्ही फाटकातील गेट बंद केली जात असतात. त्यामुळे मिनी ट्रेनची ये-जा सुरू असताना वाहनांची काही वेळासाठी वाहतूक बंद करणे योग्य आहे. मात्र, नेरळ पाडा भागातील फाटक हे रेल्वे अभियांत्रिकी विभागाने स्थानिक वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता बंद केला आहे. त्याचा मोठा फटका पाडा विभागातील स्थानिकांना बसला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल मध्य रेल्वे विभागीय महाव्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. रेल्वेकडून घेण्यात आलेला ब्लॉकांची माहिती प्रशासनाने स्थानिकांना का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेरळ येथील मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाने कोणत्या आधारे फाटक वाहतुकीस बंद करण्याचा हा निर्णय घेतला? याविषयी विभागीय महाव्यवस्थापक कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.







