स्वप्नाली पवार यांच्या नेतृत्वात यशस्वी कारवाई
| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथक प्रमुख स्वप्नाली पवार यांनी चौक विभागात दोन बालविवाह रोखल्याने एक अनिष्ट प्रथा थांबली आहे. दामिनी पथकातील पोलीस हवालदार स्वप्नाली पवार व पोलीस शिपाई केंद्रे यांनी खालापुरात बालविवाह प्रतिबंधक मोहिमेंतर्गत वावंढळ आदिवासी आनंदवाडी व भिलवले ठाकूरवाडी येथे गस्त घालत होत्या. त्यावेळी या दोन्ही ठिकाणी त्यांना अल्पवयीन विवाह होत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्वरित त्यांचे जन्मदाखले आणि आधार कार्डची तपासणी केली. त्यावेळी वधू आणि वर अल्पवयीन असल्याचे दिसून आले.
पोलीस हवालदार स्वप्नाली पवार यांनी ही बाब त्वरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना कळवली. त्यांच्या सूचनेनुसार वधू व वरांच्या आई-वडील व नातेवाईकांसह पोलीस पाटील, सरपंच, चौक प्रभारी विशाल पवार यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत माहिती दिली व त्यांना विवाह वय कायद्यानुसार योग्य झाल्यानंतर लग्न करण्याची माहिती दिली.







