। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे उपनगरात सकाळच्या शांत वातावरणातही गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. सेक्टर 6 परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 49 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी क्षणात हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यापूर्वी महिलांना चोरटे लक्ष्य करत होते. मात्र, सोन्याचे वाढलेले दर ध्यानात घेता आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याने चोरट्यांनी पुरूषांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामोठेतील सेक्टर 6 ए परिसरातील एल्लोरा हाईट्स येथे राहणारे संबंधित व्यक्ती सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पाळीव श्वानासह फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. अचानक भरधाव वेगात दुचाकीवरून दोन चोरटे त्यांच्या दिशेने आले. काही कळण्याच्या आतच त्यांनी त्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी झडप घालून हिसकावली आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले.
या सोनसाखळीची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पीडित व्यक्तीने तत्काळ कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद मसलकर यांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सकाळी व सायंकाळच्या वेळी अशा प्रकारच्या स्त्री पुरूषांना लुटीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून अशा गुन्हेगारांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






