नगरपरिषदेच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष; जास्त बांधकाम करण्यांच्या घटनांत वाढ
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाची संख्या वाढती असून, या बाबतीत आता नगरपरिषद ॲक्शन मोड वर येणार की अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाला अभय देणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले झाले आहे. नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले आता या बाबतीत काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे.
स्वतः मालकीची हद्द सोडत सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून नाले, गटारावर सर्रास सिमेंट काँक्रिटीकरणचे बांधकाम करत व्यवसायाकरीता जागा वापरणे तसेच रस्त्यालगत अनधिकृत व्यापारी गाळे उभारण्याच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. इमारत अथवा घराचे बांधकाम करताना नगर परिषदेकडून नकाशा मंजूर न करून घेता किंवा बांधकाम परवाना न घेता केलेले बांधकाम करण्यात येणे, नगरपरिषदेने दिलेल्या परवानगीपेक्षा किंवा मंजूर चटईक्षेत्र निर्देशांकापेक्षा जास्त बांधकाम करणे, अशा घटनांत गेल्या दहा ते पंधरा वर्षांत वाढ झाली आहे.
निवासी संकुले, दोन मजली रिसॉर्ट, इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर ते मंजूर नकाशाप्रमाणेच झाले आहे, याची खात्री पटल्यावर नगर परिषदेकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतरच इमारतीत राहणे कायदेशीर ग्राह्य धरले जाते. जागेच्या स्थितीनुसार पर्यावरण विभागाचा दाखला गरज भासल्यास अग्निशमन दल नाहरकत प्रमाणपत्र इत्यादींची आवश्यकता भासू शकते. सद्यस्थितीत उभारण्यात आलेल्या इमारतींबाबत सर्व प्रमाणपत्रे आहेत की हा संशोधनाचा विषय आहे.
धनदांडग्यांना वरदहस्त कोणाचा ?
शहरातील एका धनदांडग्या व्यक्तीने नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाडीत सेंट्रिंग व प्रबलित सिमेंट काँक्रीटचे (आरसीसी) अनधिकृत जोते (पाया) उभारत बांधकाम सुरू केले होते. नगरपरिषदेकडून वारंवार नोटीस बजावूनही काही प्रतिसाद न मिळाल्याने नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले सेंट्रींग आणि जोते पूर्णपणे जमीनदोस्त केले होते. नगरपरिषदेच्या नोटीसला धुडकवणाऱ्या धनदांडग्याला कोणाचा वरदहस्त होता. याची चर्चा नागरिकांत सुरू होती.
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये ज्यांनी अतिक्रमित बांधकामे केलेली आहेत किंवा अनधिकृत बांधकामे केलेली आहेत अशा बांधकामांची सखोल चौकशी केली जाईल व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रचलित कायद्यांच्या विरुद्ध जाणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही.
ॲड. अतुल चौगुले
नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद.







