चिठ्ठीमध्ये पी.जी. पाटील सही
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग समुद्र किनारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (दि.22) सायंकाळी घडली. लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीवरून तिनेच आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पी.जी.पाटील अशी सही त्या चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग समुद्रकिनारी किनारी एक महिला बेशुध्द अवस्थेत असल्याचे जीव रक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब अलिबाग पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुध्द अवस्थेत असलेल्या महिलेच्या बाजूला एक पर्स होती. त्या पर्सची पाहणी केली असता, ओळखीचा कोणताही पुरावा सापडला नाही. अखेर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बेशुध्द अवस्थेत महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून ती अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. दरम्यान महिलेच्या पर्समध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये ती आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. पी. जी. पाटील अशी तिने सही केली आहे. त्यामुळे या महिलेने आत्महत्या का केली हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. मृत महिलेचे वय साधारणतः 40 वर्षे असून उंची साडेपाच फुट, अंगाने सडपातळ व रंग निमगोरा आहे. कोणाला ओळख पटल्यास अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






