| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे रविवारी (दि.3) एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस अचानक रस्त्यावर पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
हे सर्व प्रवासी टिटवाळा येथून माणगाव बाजूला एका साखरपुड्याच्या समारंभासाठी निघाले होते. शिरढोण परिसरात साई कृपा हॉटेल समोर ही बस पलटी झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काही जणांना पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी आहे. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.







