महिलेला धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सज्जनांचे रक्षण आणि गुन्हेगारांचा नायनाट हे पोलिसांचे ब्रीदवाक्य असले तरी सोमवारी सायंकाळी पोयनाड पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारामुळे उलट चित्र समोर आले आहे. एका महिलेला गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मारहाण करूनही त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेलाच हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप होत आहे. “तक्रार करून काहीच फायदा होणार नाही” असे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने पोयनाड पोलीस ‘शेठचे गुलाम’ झाले आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हाशिवरे परिसरातील ही महिला आपल्या पतीसोबत सोमवारी (दि. 4) सायंकाळी पेण येथे लग्न समारंभासाठी चारचाकी वाहनाने जात होती. चरी-कोपर परिसरात पोहोचल्यावर त्यांच्या कारला एका ट्रकने धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेच्या पतीने वाहन थांबवून चालकाला जाब विचारला असता, ट्रक चालक संतापून त्यांच्या अंगावर धावून गेला आणि धक्काबुक्की केली. यावेळी “मी पोयनाड पोलिसांना हप्ता देतो, त्यामुळे पोलीस काहीच करू शकत नाहीत” असे उघडपणे वक्तव्यही त्याने केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, काही गुंड प्रवृत्तीची मंडळी तेथे धावत आली आणि त्यांनी अश्लील शिवीगाळ करत महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. या घटनेनंतर संबंधित महिलेने तातडीने पोयनाड पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पोलीस हवालदार थळे आणि घरत यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत “अधिकारी आल्याशिवाय नोंद करता येणार नाही” असे सांगत वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे.
काही वेळानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे ठाण्यात आले. त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत “गुन्हा दाखल करून काहीच उपयोग होणार नाही” असे सांगून संबंधित महिलेला व तिच्या पतीला हुसकावून लावल्याचे समोर आले आहे. सुमारे चार ते पाच तास हा प्रकार सुरू होता. मारहाण करणारी मंडळी ही लालचंद यांच्या नातेवाईकांची असल्याची माहिती पुढे येत असून, त्यामुळे पोयनाड पोलीस सर्वसामान्यांसाठी नसून ‘शेठ’च्या दबावाखाली काम करत असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पोलीस यंत्रणाच जर प्रभावशाली व्यक्तींसमोर नतमस्तक होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यावी, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर या प्रकरणात संबंधित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार मांडला. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
गडदे अडचणीत सापडण्याची शक्यता
“पोयनाड पोलीस काहीच वाकडे करू शकत नाहीत, आम्ही हप्ता देतो,” असे सांगत ट्रक चालकासह अन्य मंडळींनी महिलेला व तिच्या पतीला धक्काबुक्की व मारहाण केली. या उघड गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असून, त्यामुळे गडदे अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सायंकाळी घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित महिलेची तक्रार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्याची नोंद आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यांना योग्य पद्धतीने वागणूक देण्यात आली आहे.
सुजित गडदे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोयनाड पोलीस ठाणे







