मालूक गणेश नगर घाटात भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी
। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील मालुक-गणेशनगर घाटमार्गावर शनिवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मालुक येथून मजगावकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या मिनीडोअरचा गणेशनगर येथील तीव्र उताराच्या घाटातील धोकादायक वळणावर अचानक ब्रेक फेल झाला आणि गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.
या अपघातात पांडुरंग काप (50), रा. वाशी हवेली हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सीताराम जाईलकर (58), शिल्पा जाईलकर (58), हर्षदा जाईलकर (40), समृद्धी जाईलकर (39) तसेच मिनीडोअर चालक शहनवाज वगनाक (45) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जाईलकर कुटुंब मालुक येथील लग्न समारंभ आटोपून मजगावकडे परतत होते. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. त्यामुळे लग्न समारंभाचे वातावरण काही क्षणातच शोककळेत बदलले. दरम्यान, मालुक–चोरीवली–कासेखोल–गणेशनगर–मजगाव- म्हसळा या मार्गावरील एस.टी. सेवा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अशा धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. अपघाताचे वृत समजताच म्हसळा पोलीस स्टेशनचे रविंद्र पारखे, हे कॉ. सुरेश पालोदो, सदाशिव विघ्ने, सागर चितारे, पोलीस अक्षय पुरी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली.







