आण्णासाहेब उर्फ पोपटराव देशमुख यांचे निधन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र आण्णासाहेब उर्फ पोपटराव देशमुख यांचे सोमवारी (दि. 11) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 69 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आण्णासाहेब देशमुख हे मोहोळ तालुक्यातील पेनुर गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील स्व. गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी राज्याच्या राजकीय क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली होती. राजकीय वारसा लाभूनही आण्णासाहेब देशमुख यांनी अत्यंत साधेपणाने जीवन जगत सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात आण्णासाहेब देशमुख यांचे मोठे योगदान होते. बाबासाहेब देशमुख यांना राजकारणात उभारी देण्यात आणि आमदारपदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांना विशेष मान आणि आदराचे स्थान होते. कष्टाळू, प्रामाणिक आणि जमिनीशी नाळ जोडून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
मंगळवारी (दि. 12) सकाळी मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे रक्षा पूजन बुधवारी (दि. 13) सकाळी होणार असून, 20 मे रोजी दशक्रिया विधी पार पडणार असल्याची माहिती देशमुख कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.





