दुर्गवेध परिवाराने शोधली दातारांची ऐतिहासिक विहीर
| पाली/गोमाशी | भूषण सुतार |
पालीजवळील किल्ले सरसगडाच्या कुशीत लपलेला इतिहासाचा आणखी एक महत्त्वाचा ठेवा अखेर प्रकाशात आला आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी आपल्या संशोधनात उल्लेख केलेली दातार यांच्या विहारीवरील शिलालेख असलेली ऐतिहासिक विहीर दुर्गवेध परिवाराने तब्बल तीन महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर शोधून काढली. झाडीझुडपांनी गिळंकृत झालेल्या या वास्तूला स्वच्छ करून पुन्हा इतिहासप्रेमींसाठी खुलं करण्यात आलं आहे.
किल्ले सरसगड परिसरात इतिहासाच्या अनेक खुणा आजही संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. याच पार्श्वभूमीवर दुर्गवेध परिवाराने सरसगड परिसरात विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी वाचन केलेल्या दातार यांच्या विहारीवरील शिलालेखाचा उल्लेख संशोधन निबंधात आढळत असला, तरी त्या विहिरीचे अचूक स्थान काळाच्या ओघात विस्मरणात गेले होते.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान शिलालेखातील स्थानिक उल्लेख, भौगोलिक संदर्भ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीच्या आधारे अखेर ही ऐतिहासिक विहीर शोधण्यात यश आले. अनेक वर्षे वहिवाट नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे आणि रान माजले होते. त्यामुळे ही विहीर सहज नजरेस पडत नव्हती. मोहिमेदरम्यान दुर्गवेध परिवाराने परिसरातील अडगळ दूर करून विहीर पुन्हा इतिहासप्रेमींसाठी खुली केली. मात्र, दुर्दैवाने ज्या भागावर शिलालेख कोरलेला होता तो भाग विहिरीत कोसळल्याने मूळ शिलालेख अद्याप हाती लागलेला नाही.
याच मोहिमेत विहिरीच्या पश्चिमेला असलेल्या श्री थाडेश्वर गोसावी मठ परिसरातील 14 ऐतिहासिक समाध्यांचाही परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच त्या समाध्यांची नोंद व माहिती संकलनाचे कामही करण्यात आले. या शोधामुळे किल्ले सरसगडच्या इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय समोर आल्याची माहिती दुर्गवेध परिवाराचे संस्थापक नितेश देसाई यांनी दिली. तसेच परिसरातील आणखी दोन शिलालेखांचे वाचन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेत दुर्गवेध परिवारासोबत शिवसेवक प्रतिष्ठान आणि स्वराज्याचे शिलेदार यांनीही सहभाग नोंदवला.
सरसगड परिसरातील इतिहासाच्या खुणा जतन करण्यासाठी दुर्गवेध परिवार सातत्याने कार्यरत आहे. दातारांची ऐतिहासिक विहीर आणि समाधी परिसर उजेडात आल्याने सरसगडच्या इतिहासात आणखी महत्त्वाची भर पडली आहे. भविष्यातही अशाच दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू शोधून त्यांचे संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
नितेश देसाई






