| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने पांजरपोळ येथे गुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पशुपालक व शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये सुमारे 200 गुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये लहान वासरांचाही समावेश होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरांची तपासणी करून आवश्यक लसीकरण तसेच औषधोपचार केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शेतकरी व पशुपालकांनी स्वागत केले.





