। चिरनेर । प्रतिनिधी ।
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भातबियाणांसह इतर पिकांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. उरण तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या बैठकीतून आढावा घेतला जात आहे. तसेच महाबीजासह इतर खाजगी कंपनीकडून बियाणे व खते उपलब्ध होणार आहेत. दरम्यान उरण तालुका कृषी विभागामार्फत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गावोगावी दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत, जीवामृत असे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी चिरनेर येथील श्री महागणपती शेतकरी गटातर्फे दशपर्णी अर्क तयार करण्यात आला आहे. कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.17) दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
यामध्ये कडुलिंबाची पाने, करजाची पाने, निरगुडीची पाने, घाणेरीची पाने, सिताफळीची पाने, रुईची पाने, पपईची पाने, मोमरी एरंडाची पाने, लाल कन्हेरीची पाने, गुळवेल, धोतरा शेण, गोमूत्र या सर्व मिश्रणातून दशपर्णी अर्क तयार करण्यात आला आहे. या दशपर्णी अर्कामुळे कीड व रोग नियंत्रणास मदत होईल. मातीची सुपीकता वाढली जाते. पिकांची वाढ व उत्पादन वाढते. नैसर्गिक व पर्यावरण पूरक, शाश्वत शेतीसाठी उपयुक्त असे हे अर्क असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.







