| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनींचा त्याग करणाऱ्या ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी बेलापूर येथील सिडको भवन येथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध न्याय्य मागण्यांवर आक्रमकपणे बाजू मांडली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तातडीने एक विशेष बैठक आयोजित करून हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, कामगार नेते भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, संतोष पवार, ॲड. रोशन पाटील, सिडको युनियन अध्यक्ष संजय पाटील, मयूर तांडेल, अविनाश सुतार, संजय पाटील, हिमांशु पाटील, रवी मढवी, संतोष घरत, राज पाटील आदींसह इतर प्रमुख प्रकल्पग्रस्त व पदाधिकारी उपस्थित होते.







