बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे शेकापची मागणी
भाई मोहन गुंड यांचा प्रशासनाला थेट इशारा
| बीड | जिल्हा प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यात डिझेलची खुल्या स्वरूपातील विक्री बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतीची कामे खोळंबण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डिझेल कॅड किंवा डब्यात देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव डिझेलची खुल्या स्वरूपात विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असला तरी त्याचा थेट फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणी आणि आंतर मशागतीची कामे सुरू झाली आहेत. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पंपसेट, जनरेटर, थ्रेशर यांसारखी शेती अवजारे थेट शेतातच वापरली जात असल्याने त्यामध्ये डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांना कॅड किंवा डब्याचा वापर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर किंवा अवजारे पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसते, कारण अनेक गावांमधून पंपांचे अंतर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत आहे.
डिझेल उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे अर्धवट सोडून द्यावी लागत आहेत. काही ठिकाणी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी दुप्पट-तिप्पट दराने डिझेल विकत घेण्यास मजबूर होत असल्याची गंभीर बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.
भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याचे आम्हालाही मान्य आहे. मात्र, अन्नदाता शेतकरी जगला तरच देश जगेल. शेतीच बंद पडली तर ते युद्धापेक्षाही मोठे संकट ठरेल. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय तातडीने घ्यावा.
शेतकऱ्यांच्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन डिझेल कॅड किंवा डब्यात देण्यास तातडीने परवानगी द्यावी, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.







