प्रवाशांचे हाल; नागरिकांमधून संताप व्यक्त
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा-अष्टमी रेल्वे क्रॉसिंगवरील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचे काम तब्बल तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक आणि प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. खराब रस्ता, उडणारी धूळ, खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतुकीची कोंडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. आता पावसाळा तोंडावर आल्याने या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
रोहा-नागोठणे मार्गावरील अष्टमी रेल्वे क्रॉसिंग येथे सतत रेल्वे फेऱ्या वाढल्याने गेट वारंवार बंद राहत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जानेवारी 2023 मध्ये खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून सुमारे 65 कोटी रुपयांचा रेल्वे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला. रेल्वे आणि राज्य सरकार यांनी प्रत्येकी 50 टक्के निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. उद्घाटनावेळी हे काम एका वर्षात पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही पुलाचे काम अपूर्णच आहे.
सुरुवातीला हे काम ‘मदिना इन्फ्रा’ या ठेकेदार कंपनीकडे होते. मात्र, त्यांनी काम अर्धवट सोडल्याची चर्चा आहे. त्यानंतर ‘मदानी इन्फ्रा’ या कंपनीने काम हाती घेतले. जवळपास दोन वर्षे काम सुरू राहिले; पण ही कंपनीदेखील अचानक गायब झाली. आता ‘व्हीएसआर’ कंपनीकडे कामाची जबाबदारी देण्यात आली असून, काम सुरू असले तरी गती अत्यंत मंद असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, पुलाच्या कामामुळे या परिसरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. मोठमोठे खड्डे, चिखल आणि धोकादायक वळणे यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. गेल्या पावसाळ्यात या ठिकाणी अनेक अपघात झाले होते. काहींना आपला जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी किमान रस्त्याची डागडुजी तरी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एका वर्षात पूर्ण होणारे काम तीन वर्षे सुरूच आहे. ठेकेदार बदलतात, पण काम पूर्ण होत नाही, नेमकं सुरू काय आहे? असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. खा. सुनील तटकरे यांनी निधी आणून मोठी घोषणा केली खरी; मात्र काम वेळेत पूर्ण करण्यात यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती, बदलणारे ठेकेदार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहता हा उड्डाणपूल नेमका कधी पूर्ण होणार, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती व पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







