फायर ब्रिगेडचा नंबर ‘नॉट रीचेबल’
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील दाटीवाटीच्या कापड बाजार परिसरात जैन मंदिरासमोरील ‘जलाराम सावित्री’ इमारतीच्या मीटर रूमला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. वायरिंगच्या माध्यमातून आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शिवसैनिक ॲड. स्वप्निल उपाध्ये यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
आग लागल्यानंतर ॲड. उपाध्ये यांनी तातडीने महापालिकेच्या वेबसाईटवर आणि अग्निशमन दलाच्या वाहनांवर नमूद असलेल्या 022-27461500 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा क्रमांक कार्यरत नसल्याचे समोर आले. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाचा संपर्क क्रमांक बंद असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
यानंतर ॲड. उपाध्ये यांनी शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्याशी संपर्क साधला. ॲड. सोमण यांनी तातडीने नवीन पनवेल सिडको फायर विभागाशी संपर्क साधून पनवेल शहरातील अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
या घटनेनंतर ॲड. प्रथमेश सोमण यांनी सकाळीच फायर ब्रिगेड स्टेशनला भेट देत प्रशासनाला धारेवर धरले. दोन दिवसांत नवीन अधिकृत संपर्क क्रमांक सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अग्निशमन प्रमुखांचा थेट संपर्क क्रमांक फायर ब्रिगेडच्या गाड्यांवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या वतीने अवघ्या तासाभरात नवीन संपर्क क्रमांकाचे स्टिकर्स तयार करून ते अग्निशमन दलाच्या वाहनांवर लावण्यात आले. तसेच महापौर आणि आयुक्तांनाही या प्रकाराची माहिती देत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या माहितीसाठी अग्निशमन प्रमुख अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक 081083 80101 जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, उपविभागप्रमुख मंदार काणे आणि शाखाप्रमुख गुलाब बागवान उपस्थित होते. शिवसैनिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






