| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याची ओळख आता अधिक आधुनिक आणि स्वच्छ पर्यटनस्थळ म्हणून होणार आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारा स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन, श्रीवर्धन नगरपरिषदेने स्मार्ट पाऊल उचलले आहे. किनाऱ्यावरील बंधाऱ्यालगत दोन अत्याधुनिक ई-शौचालये कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
श्रीवर्धनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे पर्यटकांची, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी ओढाताण होत होती. ही बाब गांभीर्याने घेत नगरपरिषदेने पूर्णपणे स्वयंचलित आणि हायटेक प्रणालीवर आधारित ई-शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. किनाऱ्यालगतच्या बंधाऱ्यावर ही दोन शौचालये बसवण्यात आली असून, ती वापरासाठी खुली करण्यात आली आहेत. ही शौचालये पूर्णपणे सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित आहेत. “पैसे भरा आणि वापरा” या तत्त्वावर ती चालणार असून, नाणे टाकल्यानंतरच या शौचालयाचा दरवाजा उघडला जातो. विशेष म्हणजे, वापरकर्त्याने वापर करून बाहेर आल्यानंतर ही शौचालये सेन्सरच्या साहाय्याने आपोआप स्वच्छ होतात. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय ही जागा चोवीस तास स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक शौचालयासाठी 500 लिटरची स्वतंत्र पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यामध्ये हाय-प्रेशर नोझल्स वापरण्यात आले आहेत. ऊर्जेची बचत करण्यासाठी स्मार्ट दिवे आणि एक्झॉस्ट फॅन आहेत, जे दरवाजा उघडताच सुरू होतात आणि वापरानंतर बंद होतात. किनाऱ्याचे सौंदर्य आणि पर्यावरण राखण्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र सेफ्टी टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. ही शौचालये महिला आणि दिव्यांगांसाठी अत्यंत सुरक्षित अशा मेटॅलिक बॉडीमध्ये तयार करण्यात आली आहेत.







