| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, तहसीलदार तथा दंडाधिकारी कार्यालय पाली सुधागड यांच्या वतीने मंगळवारी (दि.25) स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शिबिरात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण केले.
आपत्तीच्या प्रसंगी मदत कार्य किती वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचू शकते, याची अचूक चाचपणी करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळावर एक विशेष मअपघात मॉकड्रिलफ घेण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये महाराष्ट्र सीमलेसचे अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासन तसेच पोलीस दलाच्या जवानांनी सक्रिय सहभाग घेतला. या मॉकड्रिलला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे दिले. यामध्ये आपत्तीच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बांबू, ब्लँकेट किंवा कपड्यांच्या साहित्यापासून तातडीने स्ट्रेचर कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शासनाकडून पुरवण्यात आलेल्या अत्याधुनिक लाईफ जॅकेट, सुरक्षा सूट आणि इतर आपत्ती निवारण साहित्याची ओळख करून देऊन त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, हे शिकवण्यात आले. आग, वादळ, पूर आणि इतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी स्वतःचा जीव वाचवून इतरांना सुरक्षित कसे बाहेर काढावे, याचे नियोजन समजावून सांगण्यात आले.
पाली तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारे जवळजवळ सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध असून कोणत्याही आपत्ती समयी त्याचा तातडीने उपयोग केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.






