ग्रामीण कलावंतांना मिळाला हक्काचा रंगमंच
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामीण रंगभूमीवरील कलावंतांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देत ‘नाट्यप्रभा’ महोत्सवाने मराठी रंगभूमीच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले आहे. ग्रामीण भागातील कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम राज्यातीलच नव्हे तर, देशातील एक आगळावेगळा प्रयोग असल्याचे मत ज्येष्ठ नाटक दिग्दर्शक व लेखक किशोर म्हात्रे यांनी व्यक्त केले.
महोत्सवानिमित्त व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात म्हात्रे यांनी आयोजक चित्रलेखा पाटील आणि ग्रामीण रंगभूमीच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. ग्रामीण भागातील नाट्यसंस्थांना केवळ सादरीकरणाची संधीच नव्हे, तर सुसज्ज रंगमंच, तांत्रिक सुविधा आणि प्रोत्साहनपर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे ही दुमिळ बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
महोत्सवात सादर झालेल्या विविध नाटकांचा उल्लेख करताना त्यांनी ‘गजा आला रे’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘करमरकर हाऊस’, ‘विदूषक’ आणि ‘वारी’ या नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण रंगभूमीवरील वैविध्य, प्रयोगशीलता आणि कलात्मक क्षमता अधोरेखित झाल्याचे सांगितले. प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत आणि सादरीकरणाच्या बाबतीत अनेक प्रयोग व्यावसायिक रंगभूमीशी स्पर्धा करणारे होते, असेही त्यांनी नमूद केले.
महोत्सवातील वक्तशीरपणा, नटराज पूजनाची परंपरा, गुणवंतांचा सन्मान आणि सुबक आयोजन यांचेही त्यांनी कौतुक केले. ग्रामीण कलाकारांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता असल्याचे सांगत त्यांनी बदलत्या काळानुसार तांत्रिक बाबींचा अधिक अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. नाटक हे सतत बदलणारे माध्यम असून आधुनिक तंत्रज्ञान, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि रंगभाषेचा अभ्यास केल्यास ग्रामीण रंगभूमी अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.
गेली चार दशके रंगभूमीवर कार्यरत असलेल्या किशोर म्हात्रे यांनी आपल्या अनुभवातून अनेक नामवंत कलाकारांच्या जडणघडणीचे साक्षीदार असल्याचे नमूद केले. आज व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये यशस्वी ठरलेल्या अनेक कलाकारांच्या सुरुवातीच्या प्रवासात सहभागी होण्याची संधी लाभल्याचे सांगितले. तसेच नवोदित कलाकारांनी सातत्याने शिकत राहावे, असा सल्लाही म्हात्रे यांनी दिला.
चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित झालेला ‘नाट्यप्रभा’ महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, ग्रामीण रंगभूमीच्या नव्या उभारणीची नांदी आहे. भविष्यात ग्रामीण कलाकारांसाठी व्यावसायिक संधी निर्माण करण्याच्या दिशेनेही प्रयत्न व्हावेत. ग्रामीण कलाकार आणि रसिकांना आनंदाचा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या उपक्रमांची परंपरा भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावी.
किशोर म्हात्रे





