| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे वसाहतीमधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत शिवसेना ठाकरे गटाने संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, कामोठे उपशहर प्रमुख गणेश खांडगे व राहुल यादव, पदाधिकारी आणि महावितरण अधिकारी यांच्या उपस्थितीत कामोठे मधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठा संदर्भात बैठक पार पडली. यावेळी महावितरनाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेंकटेश कासल, बकुल मानवटकर, संतोष पालवे, संजय मुंडे, सुजीत पाटील, अभिजित साळवी हे उपस्थितीत होते. या बैठकीत महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच सतत कामोठेमध्ये खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कासल यांनी कामोठ्याच्या लोड शेडिंगची समस्या एका आठवड्याच्या आत संपणार असल्याचे व पर्याय व्यवस्था उपलब्ध करत असल्याचे सांगण्यात आले व यापुढे नैसर्गिक कारणा व्यतिरिक्त कामोठे येथील लाईट बंद करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. जरी लाईट बंद करणार असल्यास किंवा अचानक लाईट बंद केल्यास त्वरित ग्राहकांना सूचना देण्यात येईल, असे सुद्धा आश्वासन देण्यात आले.







