प्रशासकीय, कायदेशीर आणि आरोग्य सेवांवर परिणाम
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन महिन्यांपासून एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने आरोग्य सेवांसह प्रशासकीय व कायदेशीर कामकाजावरही परिणाम होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात साडेचार वर्षे सेवा बजावणारे डॉ. किशोर कोठुळे हे सेवा अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी 26 मार्च रोजी कार्यमुक्त होऊन धुळे येथे गेल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सध्या केंद्रात बीएएमएसच्या दोन महिला वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्या तरी एमबीबीएस डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे काही महत्त्वाच्या सेवांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंचक्रोशीतील सुमारे 20 ते 25 दुर्गम गावांतील नागरिक उपचारासाठी अवलंबून आहेत. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील रुग्णही मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या केंद्रावरील कामाचा मोठा ताण आहे. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) अधिक सक्षमपणे चालविणे, आपत्कालीन रुग्णांवर तातडीने उपचार करणे, गंभीर न्यायवैद्यकीय प्रकरणे व प्रसूतीसंबंधित गुंतागुंतीच्या परिस्थिती हाताळणे, तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय निर्णय घेणे आणि रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे यावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे अनेक रुग्णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे उपचारासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असून त्याचा आर्थिक फटका विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासकीय आरोग्य सेवेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढती रुग्णसंख्या व कामाचा ताण लक्षात घेता एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी. तसेच केंद्रातील इतर रिक्त पदेही भरून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावी होत असलेल्या गैरसोयीची आम्हाला जाणीव आहे. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सरळ सेवा भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जात आहेत. त्यामुळे लवकरच बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल.
डॉ.प्राची नेहुलकर
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड







