। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत नवीन पनवेल येथील गणेश मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे तसेच उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रूपाली माने आणि प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच एमएसएफ सुरक्षारक्षक यांच्या पथकाच्या माध्यमातून कारवाईसाठी करण्यात येत होती. दरम्यान यावेळी संबंधित अनधिकृत टपरीधारकांकडून कारवाईस विरोध करण्यात आला. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्या व अतिक्रमणांविरुद्ध महानगरपालिका नियमितपणे कारवाई करत असून, कारवाईदरम्यान विरोध करणाऱ्या संबंधितांवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.







