| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. करण नामदेव पाटील (फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. अधिक तपासात या गुन्ह्यातील आरोपीबरोबर त्याची प्रेमिका सुद्धा सहभागी होती. तिला सुद्धा गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी गाडीसह पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल तालुका पोलिसांना दि.11 एप्रिल रोजी चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. दरम्यान, मिसिंग महिलांची पडताळणी केली. यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर (30) या महिलेची ओळख पटली. तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या करण पाटील या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्याने दि.6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावात आणून तिच्यावर पेट्रोल टाकून जाळले. दरम्यान, अधिक तपासात या आरोपीबरोबर त्याची दुसरी प्रेमिका सुरेखा सिंग ही सुद्धा सहभागी होती व तिच्या समोरच या महिलेला जाळण्यात आले होते. त्याचप्रमाणे या महिलेचा मृतदेह आणण्यासाठी आरोपीने वापरलेली मित्राची गाडी व लोखंडी रॉड हा सुद्धा पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.







