संतप्त महिलांचा बिल्डरला घेराव
| पनवेल | प्रतिनिधी |
कोट्यवधी रुपये मोजून हक्काचे घर खरेदी केल्यानंतरही मूलभूत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने खारघरमधील रहिवाशांचा संयम सुटला आहे. येथील सेक्टर 35 परिसरातील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांनी अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांना घेराव घातला. मात्र, चर्चा करण्याऐवजी अशोक छाजेर यांनी रहिवाशांच्या मागण्या फेटाळत आपली लक्झरी गाडी थेट आंदोलक महिलांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप रहिवाशांनी केला आहे.
खारघर उपनगरातील अरिहंत ग्रुपच्या या हाय-प्रोफाइल गृहनिर्माण प्रकल्पात नागरिकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र, सोसायटीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना दररोज हजारो आणि महिन्याला लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. नळांना दिवसातून केवळ काही मिनिटेच पाणी येत असून, बोअरवेलची योजनाही अपयशी ठरली आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाल्याने संतप्त महिलांनी बिल्डर विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोसायटीतील महिला व पुरुष रहिवाशांनी बिल्डर अशोक छाजेर यांना घटनास्थळीच घेराव घातला. रहिवाशांनी पाणी पुरवठ्याबाबत प्रश्नांची सरबत्ती करताच, बिल्डरने प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गाडीसमोर महिला उभ्या असतानाही त्यांनी निष्काळजीपणे गाडी वेगात पुढे दामटली, त्यामुळे महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासन आणि सिडको प्रशासनाकडे तात्काळ धाव घेतली असून, संबंधित विकासकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि सोसायटीचा पाणी प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे.







