। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे येथील सोसायटीच्या पायऱ्यावर चढून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून चोरटा पसर झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी चोराविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी (दि.20) रात्री साडेआठच्या सुमारास दोन चोरट्यांनी कामोठे येथील अजिंक्यतारा सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस सोसायटीमध्ये रहिवासी तेजल मोरे या सामानाची खरेदी करण्यासाठी खाली आल्या होत्या. खरेदी केल्यानंतर त्या घरी येण्यासाठी निघाल्या. सोसायटीच्या आवारात आल्यानंतर त्या सोसायटीच्या पायऱ्या चढत असताना चोराने मागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले आणि तो तेथून पळून गेला. या प्रकारामुळे सोसायटीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस ठाण्याजवळच ही घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.







